थलपती विजय विरुद्ध राज्यपाल! तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात प्रकाश आंबेडकरांनी दिला दोन मोठ्या राजकीय घटनांचा दिला दाखला

तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकत प्रभावी कामगिरी केली.
त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे विजय यांनी 113 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र तयार केले असून ते राज्यपालांकडे सादर केल्याची माहिती आहे.
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी 118 हा बहुमताचा आकडा आवश्यक आहे. मात्र, अद्याप राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून राज्यपालांच्या भूमिकेवर टीका होत आहे.
दरम्यान, विजय यांनी आज सकाळी राज्यपालांची भेट घेऊन समर्थक आमदारांचे पत्र सादर केले. तरीही त्यांना निमंत्रण न मिळाल्याने हा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया देत दोन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची आठवण करून दिली आहे.
त्यांच्या मते, बहुमत नसल्याच्या कारणावरून सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण नाकारणे योग्य नाही. भारतीय राज्यघटनेतील कलम 164(2) नुसार, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागते.
ॲड. आंबेडकर यांनी 1989 आणि 1996 मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी सत्ता स्थापनेस नकार दिला. त्यानंतर व्ही. पी. सिंग (V. P. Singh) यांना निमंत्रण देण्यात आले आणि त्यांनी 2 डिसेंबर 1989 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
तसेच 1996 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असताना राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा (Shankar Dayal Sharma) यांनी अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. मात्र, बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने वाजपेयी सरकारला केवळ 13 दिवसांत राजीनामा द्यावा लागला.